मोदक – गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ:

मोदक हा गणपती बाप्पांना अत्यंत आवडणारा पदार्थ आहे. तसेच, तो एक पारंपरिक गोड पदार्थही आहे.
मोदकांचे दोन प्रकार असतात:
- उकडीचे मोदक – जे आपल्या लाडक्या बाप्पाला फारच प्रिय आहेत.
- तळलेले मोदक – जे गव्हाच्या पिठापासून बनवले जातात.
आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
साहित्य:
- तांदळाचे पीठ
- ओले खोबरे
- गूळ
- वेलदोड्याची पूड
- दूध
- तूप
- पाणी
- मीठ
कृती:
१. उकड (पिठ मळण्यासाठी):
- एका पातेल्यात १ वाटी दूध आणि १ वाटी पाणी एकत्र करून उकळा.
- त्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तूप घाला.
- पाणी उकळल्यावर गॅस बंद करून त्यात २ वाट्या तांदळाचे पीठ हळूहळू घालून सतत ढवळा.
- पीठ आणि पाणी व्यवस्थित मिसळून गोळा तयार झाला पाहिजे. गाठी होऊ देऊ नका.
- त्यावर झाकण ठेवून २–३ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
- नंतर ते थोडं थंड होऊ द्या. कोमट असतानाच चांगलं मळून घ्या, पीठ मऊसर हवं.
- पीठ तयार झाल्यावर ते बाजूला झाकून ठेवा.
२. सारण (मोदकाच्या आतलं गोड मिश्रण):
१ ओलं खोबरे किसून घ्या.
- कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात खोबरे हलकं परतून घ्या.
- नंतर त्यात गूळ घालून सारण एकत्र शिजवा. गूळ पूर्ण विरघळला पाहिजे.
- सारण तयार झाल्यावर गॅस बंद करून त्यात अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घाला.
- सारण थोडं थंड होऊ द्या.
३. मोदक बनवणे:
- तयार पिठाची छोट्या वाट्या (कटोऱ्या) तयार करा.
- त्यात १ ते १.५ चमचा सारण भरा.
- वाटीच्या कडे एकत्र करून मोदकाची शिंक (टोक) तयार करा.
- अशा प्रकारे सर्व मोदक तयार करा.
४. वाफवणे (उकडणे):
- एका मोठ्या भांड्यात २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा.
- मोदक ठेवण्यासाठी चाळणीला (स्टीमर प्लेटला) थोडं तूप लावा.
- तयार मोदक त्यावर ठेवा.
- चाळणी गरम पाण्यावर ठेवून वरून घट्ट झाकण ठेवा.
- १०–१५ मिनिटं वाफवून घ्या.
- गॅस बंद करून थोडं थंड झाल्यावर मोदक बाहेर काढा.
आता आपल्या बाप्पांसाठी गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत!